*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Friday 16 November 2012

हरभरा लागवडी बाबत माहिती

हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास पोषक असलेल्या हवामानाचा पिकास उपयोग होतो. पेरणी वाफशावर करावी. हरभऱ्याच्या पेरणीसाठी वाणानुसार बियाण्याचे प्रमाण ठरवावे. विकास, फुले जी-12 या वाणांचे हेक्‍टरी 70 किलो; विश्‍वास व विजय या वाणांचे 85 किलो तर दिग्विजय, विशाल व विराट या वाणांचे 100 किलो बियाणे वापरावे. प्रमाणित व खात्रीशीर बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेमध्ये प्रति किलो बियाण्यास दोन ते 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा दोन ते 2.5 ग्रॅम थायरम चोळावे. पेरणीपूर्वी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व स्फुरद जिवाणू संवर्धक चोळावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरावे. पेरणी 30 x 10 सें.मी. अंतरावर करावी. हरभरा-करडई आंतरपीक (6ः3) पद्धतीचा वापर करणे फायदेशीर ठरते. जिरायती हरभऱ्याला पेरणीपूर्वी प्रतिहेक्‍टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद जमिनीत पेरून द्यावे. बागायती हरभऱ्याला पेरणीपूर्वी प्रतिहेक्‍टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 32 किलो पालाश जमिनीत पेरून द्यावी. शक्‍यतो दोन चाडी पाभरीने पेरणी करावी. हरभरा पिकास साधारणपणे 12 सें.मी. पाण्याची गरज असते. जमिनीतील ओल पाहून पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी फांद्या फुटताना आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी घाटे भरताना द्यावे. प्रत्येक वेळी पाणी योग्य प्रमाणात द्यावे. जास्त पाणी दिले गेल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. पेरणीनंतर 21 दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी खुरपणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी.