*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Friday 16 November 2012

रोगाचे/किडीचे नाव : डाळींब मर


डाळींब

रोगाचे/किडीचे नाव : 
मर

रोगाचे कारण : 
हा रोग बुरशी , किडी आणि सूत्रतकृमींच्या प्रादुर्भावामुळे होत असून तो प्रतिबंधात्मक उपाय योजून आटोक्यात आणता येतो. 

प्रादुर्भाव व लक्षणे : 
1)झाडाची पाने शेंड्याकडून अचानक पिवळी पडण्यास सुरूवात होते. प्रथमतः एखादी फांदी वाळते. त्यानंतर त्याची तीव्रता वाढून संपूर्ण झाड वाळते. 
2)मुळे व खोडाचा आंतरछेद घेतला असता तपकिरी किंवा काळसर पट्टा दिसतो.
3)खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुंगे-याच्या (शॉट होल बोरर) प्रादुर्भावामुळे मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात. 
4)खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.
5)मुळांवर सुत्रकमीच्या गाठी दिसतात. हे प्रमाण जास्त झाल्यास झाडे मरतात. 

प्रतिबंधात्मक उपाय : 
1)कार्बेन्डॅझीमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. एक महीन्यानंतर हेक्टरी २.५ किलो ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसीस + १०० किलो शेणखत हे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी दर महिन्याला २ किलो शेणखत प्रती झाड खोडाजवळ मिसळून द्यावे. 
2)मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूच्या २ ओळीतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसिसचे प्रमाण ५ पटीने वाढवावे. तसेच ०.१ टक्के कार्बेन्डॅझीमचे द्रावण १० लिटर प्रती झाड या प्रमाणात द्यावे. 
3)सुत्रकृमी असलेल्या बागांमध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निंबोळी पेंड आणि एक ते दिड महिन्यानंतर ४० किलो १० टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. 
4)शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा द्यावा. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेवून प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओतावे. 
5)खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत 

सामान्य माहिती : 
रोगास अनुकूल बाबी – 
1) भारी आणि कमी निचरा असलेल्या जमिनीत डाळींब पिकाची झालेली लागवड 
2) पावसाळ्याच्या सुरूवातीस असलेले उष्ण आणि आर्द्रतायुक्त हवामान 
3) झाडाच्या खोड आणि मुळाभावती सतत वाजवीपेक्षा जास्त राहणारा ओलावा 
शिफारशी – 
1) डाळींब हे पीक हलक्या ४५ सें.मी. खोलीपर्यतच्या जमिनीत घ्यावे. 
2) डाळींबाची लागवड ४.५ X ३.० मीटर अंतरावर करावी. 
3) सिंचनाचे पाणी त्या ठीकाणचा बाष्पीभवनाचा दर लक्षात घेवून ठीबक पध्दतीनेच द्यावे. ही सुविधा उपलब्ध नसल्यास पूर्ण वाढ झालेल्या डाळींबास उन्हाळ्यात ८-१० पावसाळ्यात १३-१४ (पाऊस नसतांना) व हिवाळ्यात १७-१८ दिवसांनी पाणी द्यावे.