*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Tuesday 15 December 2015

हिरव्या चाऱ्यापासून तयार करा पोषक मुरघास

हिरव्या चाऱ्यापासून तयार करा पोषक मुरघास

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात मुरघास बनवण्याचे नियोजन करावे. कारण या काळात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तयार झालेल्या मुरघासाची उपलब्धता फेब्रुवारी ते मे या काळादरम्यान होऊ शकते.
- मुरघास बनविण्यासाठी एकदल (तृणधान्य) पिके जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके तसेच द्विदल (डाळवर्गीय) पिके जसे की लुसर्ण, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.
- एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कार्बोदकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे.
- द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.
- या व्यतिरिक्त हिरव्या चाऱ्याच्या बरोबरीने कृषी उद्योगातील टाकाऊ पदार्थ, फळे व भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थांचा वापरून चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या मुरघासामध्ये कमीत कमी 40 ते 50 टक्के चारा पिके असावीत.

मुरघास बनवण्याच्या पद्धती - अ) पारंपरिक पद्धती -
- जमिनीत मुरघास तयार करण्यासाठी योग्य आकाराचे खड्डे करावेत.
- सायलोपीट - जमिनीखालील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- बंकर सायलो - जमिनीखालील किंवा जमिनीवरील सिमेंट कॉंक्रीटसहित व विरहित खड्डे.
- टॉवर सायलो - जमिनीवरील टॉवरवरील पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करता येतो.

ब) आधुनिक पद्धती -
1) प्लॅस्टिक बॅग सायलेज -
विविध क्षमतेच्या व गुणवत्तेच्या प्लॅस्टिक बॅग वापरून उच्च प्रतीचा मुरघास तयार करता येतो. अशा प्रकारच्या प्लॅस्टिक बॅगा 5 किलो, 10 किलो, 50 किलो, 100 किलो, 500 किलो, 1000 किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या बॅगचा आकार हा आयातकार, चौरस, गोलाकार असतो. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात.

2) ड्रम सायलेज -
काही ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेचे प्लॅस्टिक ड्रम वापरून मुरघास बनवता येतो. प्लॅस्टिक ड्रमची क्षमता 100 ते 300 लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापर करावयाचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे.

3) बांबू सायलो -
ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे बांबू सायलो बनवले जातात. सर्वसाधारणपणे 5 मीटर x 5 मीटर x 5 मीटर आकाराची बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीच्या आतून 150 ते 200 मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिकचा कागद अंथरावा. त्यामध्ये साधारणतः 1000 ते 1500 किलोपर्यंत मुरघास तयार होतो.

मुरघास तयार करण्याची प्रक्रिया -- चारापिकाचे साधारणपणे 1 ते 2 इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत.
- मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरावा. त्यावर चारा पिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा.
- इतर पद्धतीमध्ये चारापिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरवात करावी.
- मुरघास बनत असताना आंबवण प्रक्रियेला मदत करण्यासाठी आम्ल तयार होत असते. त्यासाठी काही उपायकारक जिवाणूंची गरज असते म्हणून अशा प्रकारचे जिवाणू जर कुट्टीबरोबर मिसळले तर मुरघास लवकर व उत्तम दर्जाचा तयार होतो. त्यासाठी अशा प्रकारचे जैविक संवर्धक आजकाल बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा योग्य वापर चांगल्या दर्जाचा मुरघास होण्यासाठी आपण करू शकतो.
- मुरघास तयार करण्यासाठी कुट्टीवर युरिया, मीठ, उसाची मळी किंवा गूळ आणि खनिज मिश्रण हे पदार्थ वापरून योग्य प्रक्रिया केल्यामुळे मुरघासाची प्रत वाढवण्यास मदत होते.
प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पदार्थ ः
- युरिया - 1 किलो
- मीठ - 1 किलो
- उसाची मळी किंवा गूळ - 2 किलो
- खनिज मिश्रण - 1 किलो
वरील घटक वेगवेगळे मोजून घेऊन 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा.
- कुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी. जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. थर भरताना पायाने किंवा घूमस वापरून त्यातील हवा बाहेर काढावी. जर हवा आत दबून राहिली तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते.
- खड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून उपलब्ध असणारा पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेले गवत इत्यादी थर पसरून आच्छादन करावे.
- अशा प्रकारे तयार केलेल्या आच्छादनावर 4 ते 5 इंचांच्या मातीचा थर द्यावा. जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल. गरज भासल्यास वरून परत एकदा प्लॅस्टिक कापड झाकावे, त्यामुळे पावसाचे पाणी मुरघासामध्ये जाणार नाही.
- हवाबंद केलेला मूरघास हा 40 ते 50 दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.

अशी होते मुरघासाची प्रक्रिया - - मुरघास तयार होताना वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन चारा आंबवला जातो. हिरव्या चाऱ्याच्या पेशींमध्ये मुरघास तयार होताना श्‍वसन प्रक्रियेचा वेग जास्त असतो. या श्‍वसन प्रक्रियेत प्राणवायूचा उपयोग केला जातो. हवाबंद स्थितीत प्राणवायू संपुष्टात आल्यानंतर बुरशीची वाढ होऊ शकत नाही. काही प्रकारचे जीवाणू चाऱ्यातील शर्करा व कार्बोदके यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आम्ल तयार करतात.
- लॅक्‍टिक ऍसिड आम्ल प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते, तसेच ब्युटिरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड ही अल्पशा प्रमाणात तयार होतात. या आम्लांच्या सान्निध्यात असलेल्या जिवाणूंची वाढ होत नसल्यामुळे चारा कुजत नाही. आम्लांचे प्रमाण वाढल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया थांबते. आंबवण्याची प्रक्रिया वाढते.

मुरघासाची प्रत - - मुरघास बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या आम्ल व अल्कोहोलमुळे मुरघासाला गोड-आंबट असा सुगंध व चव येते, त्यामुळे जनावरे अशा प्रकारे तयार झालेला मुरघास चवीने व आवडीने खातात.
- उत्तम प्रतीचा मुरघास सोनेरी पिवळसर रंगाचा असतो.

मुरघासाचे फायदे - - पावसाळ्यामध्ये आवश्‍यकतेपेक्षा अधिक उत्पादित झालेला हिरवा चारा मुरघासाच्या माध्यमातून टिकवून ठेवून उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढता येते.
- हिरवा चारा कापून जनावरांना खाऊ घालताना त्यातील काही अन्नघटकांचे होणारे नुकसान मुरघासाच्या माध्यमातून टाळता येऊ शकते.
- महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन दूध वाढण्यास व दुधामध्ये सातत्य टिकून राहण्यास मदत होते. जनावरांची भूक वाढते.
- जनावरांना लागणाऱ्या खुराकाची बचत होऊन खाद्यावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.
- यातील तयार होणाऱ्या विविध आम्लांचा उपयोग शरीर पोषणासाठी होतो. वाळलेल्या चाऱ्यातील असणाऱ्या अन्नघटकांची कमतरता भरून निघते.
- मुरघास बनविण्याच्या पद्धतीमुळे पिकाखालील क्षेत्र मशागतीसाठी लवकर उपलब्ध होते. दुबार पीक घेणे शक्‍य होते.

मुरघासासाठी चारा पिकांची निवड - - मुरघासासाठी चारा पिकांची निवड करताना ते पीक लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे.
- पीक हिरवे आणि लुसलुशीत असावे. पिकाची फुलोरा येण्याआधीची अवस्था पीक कापणीसाठी योग्य असते.
- मुरघासासाठी निवडलेल्या पिकाचे खोड भरीव असावे. भरीव खोडाचे तुकडे व्यवस्थित होतात. अशा प्रकारच्या पिकांच्या खोडात भरपूर शर्करा व कार्बोदके असतात.
- मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या चारा पिकामध्ये कापणीच्या वेळी पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. जर पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल तर 4 ते 5 तास पीक उन्हात वाळू द्यावे जेणेकरून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

मुरघास द्यावयाची पद्धत - - 50 ते 60 दिवसांनी तयार झालेला मुरघास उघडल्यानंतर काही वेळ तसाच उघडा ठेवावा. आवश्‍यकतेनुसार हवा तेवढाच मुरघास काढून घ्यावा. मुरघास काढून घेतल्यानंतर उरलेला मुरघास प्लॅस्टिकच्या कागदाने परत तसाच झाकून ठेवावा.
- सर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस 20 ते 25 किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध देण्याच्या क्षमतेवर व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
- आपल्या आवश्‍यकतेनुसार खड्डा करावा. साधारणपणे 1 फूट x 1 फूट x 1 फूट आकाराच्या खड्ड्यात 15 ते 16 किलो मुरघास मावतो.

संपर्क - (020) 26926248/26926265
(लेखक बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे येथे कार्यरत आहेत.)