*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Tuesday 15 December 2015

भूईमूग शेंगा तोडणी यंत्र

भूईमूग शेंगा तोडणी यंत्र 



उन्हाळी हंगामात भुईमूग आणि सूर्यफुलासारखी पीके काढणीसाठी एकाच वेळी येतात. ही पीके काढल्यानंतर त्याच्या शेंगा वेगळ्या करताना मजुरांची मोठी टंचाई भासते. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा चरापले यांनी भुईमूगाच्या शेंगा तोडणारे आणि सुर्यफुलाची मळणी करणारे यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे त्यांचे भुईमूग आणि सूर्यफुलाच्या काढणीचे काम सोपे झाले आहे. 

रसायनशास्त्राचे पदवीधर असलेले कृष्णाभाऊ चरापले हे भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. पंचक्रोशीत ते के बी या नावाने प्रसिद्ध आहेत. विज्ञान शिक्षकाचा पिंड आणि हाडाचा शेतकरी यामुळे शेतात काम करताना येणाऱ्या अडचणींकडे बघण्याची वेगळी दृष्टी त्यांना लाभली होती. त्यांच्या भागात उन्हाळी भुईमूग आणि सूर्यफुलाची शेती केली जाते. काढणीला मजुर न मिळणे हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले. के.बी यांनी यावर उपाय शोधायचे ठरवले. त्यांनी २००५मध्ये सायकलचे भाग वापरून शेंगा तोडणारे यंत्र बनवले. यामधील अडचणींची सुधारणा करत २००८ मध्ये पॅडलवर चालणारे शेंगा फोडणी यंत्र तयार झाले.

या यंत्राला जाळीचा अडीच फूट लांब आणि एक फूट व्यास असणारा ड्रम बसवला आहे. या ड्रमवर एक बाय एक इंचाची जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीवर आडव्या पट्ट्या बसवण्यात आल्या आहेत. यावरच भूईमूगाच्या शेंगा किंवा सोयाबीनची मळणी केली जाते. हा ड्रम एका स्टँन्डवर फिट करण्यात आला आहे. याला नऊ आणि दिड इंची गिअर बसवण्यात आलेत. पायडल दाबून शाप्टद्वारे गिअरला गती मिळते आणि ड्रम वेगाने फिरतो. या फिरणाऱ्या ड्रमवरच्या जाळीत अडकून शेंगा वेगळ्या होतात. एका एकरातील शेंगा तोडायचे काम तीन मजूर चार दिवसांत पूर्ण करू शकतात. 

तीन मजूर एका दिवसात या यंत्राच्या सहाय्याने २५० ते ३०० किलो शेंगा तोडण्याचे काम सहज करतात. हेच काम हाताने करायचे झाल्यास एक मजुर दिवसात ३० ते ५० किलो शेंगा तोडू शकतो. या यंत्राच्या सहाय्याने सूर्यफुलाची मळणी करायची असल्यास ३ मजूर ४ दिवसांत एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करु शकतात. याउलट मजुरांनी या यंत्राशिवाय हाताने एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करायचे झाल्यास ३ मजुरांना १० दिवसांचा कालावधी लागतो. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे एकरी १.५ ते २ हजार रुपयांची बचत होते. शिवाय वेळ आणि कष्टांची सगळ्यात जास्त बचत होते. 

या भूईमूग तोडणी यंत्रामुळे कृष्णा चरापले यांना गेल्यावर्षी नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन संस्थेने नवसंशोधनाचे प्रमाणपत्र दिले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही एका प्रदर्शनात त्यांचे कौतुक केले. चपराले यांनी परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या मशिनची निर्मिती केली. त्याची विक्री ते अवघ्या पाच हजार रूपयांत करतात. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ आणि पैसै वाचण्यात मदत झाली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळायला हवे. यामुळे के. बी. यांच्यासारखे असंख्य संशोधक देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांचे श्रम कमी करतील हे नक्की...