*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Saturday 22 December 2012

संशोधक शेतकरी पंढरीनाथ मोरे यांचे नियोजन


संशोधक शेतकरी पंढरीनाथ मोरे यांचे नियोजन नगर जिल्ह्यातील सांगवी भुसार येथील पंढरीनाथ मोरे यांची संशोधक आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून सर्वत्र ओळख आहे. अवर्षणग्रस्त परिस्थितीतही पाण्याचे नियोजन चांगले करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे. मोरे यांच्या 33 एकर क्षेत्रातील फळबागेत सध्या चिकू, पेरू, आवळा, मोसंबी, आंबा आदी फळझाडे आहेत. दुष्काळी स्थितीतही बाग हिरवीगार ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या प्रयत्नांबद्दल सांगताना मोरे म्हणाले, की सन 1990 पासून संपूर्ण फळबाग क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करत आहे. पावसाचे पाणी छतावर साठवूनही त्याचे व्यवस्थापन केले आहे. स्थानिक गरजेचा विचार करून मी "वॉटर कंडिशनर' उपकरण विकसित केले आहे. पाण्याच्या अचूक नियोजनासाठी त्याचा फायदा झाला आहे. या उपकरणामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारते. 
कसे आहे उपकरण? 

मोरे म्हणाले, की या वॉटर कंडिशनरमध्ये कॅटॅलिक आणि मॅग्नेटिक परिणाम तयार होतात. विहिरीच्या काठावर हे वॉटर कंडिशनर उपकरण लावायचे असते. त्यात व्हेंच्युरी असते. ज्या शेतकऱ्यांना याचा वापर करायचा आहे ते शेतकरी पाण्याचा नमुना तपासून म्हणजे त्याचा पृथक्‍करण अहवाल आणून आमच्याकडे देऊ शकतात. त्यावरून त्याच्या गरजेनुसार वॉटर कंडिशनरमध्ये सुधारणा करता येते. यात शेतकऱ्याचा पंप प्रति मिनिट किती लिटर पाणी डिसचार्ज करतो, मोटर किती एचपीची आहे ते पाहावे लागते. उपकरण यंत्रणेत एक कॅटॅलिस्ट चेंबरही असतो. तो जमिनीखाली साडेतीन फूट खाली बसवला जातो. वॉटर कंडिशनरमधून पाणी पुढे गेल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होतात. पाण्याचा पृष्ठीय ताण (सरफेस टेन्शन) कमी होतो. पाणी अधिक प्रमाणात जमिनीमध्ये झिरपते. कॅटॅलॅक्‍टिक इफेक्‍टमुळे पाण्याला वेटर इफेक्‍ट (अधिक ओलावा धरणारे पाणी) प्राप्त होतो. 

माती अधिक सच्छिद्र होते. भुसभुशीत होते व वाफसा अधिक काळ टिकून राहतो. अधिकाधिक पाण्याची बचत होते. आमच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या उपकरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी असूनही आमचे गाव हिरवेगार झाले आहे. 

वॉटर कंडिशनर वापरल्याचे फायदे 
1) पाण्याची गुणवत्ता सुधारते 
2) पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. 
3) जमिनीत लाभदायक पोकळ्या तयार होऊन ओलावा टिकून राहतो. 
4) केषाकर्षणामुळे (कॅपिलरी ऍक्‍शन) वनस्पती पाणी शोषून घेतात व तगून राहू शकतात. 

फळबाग लागवडीचा फायदा म्हणजे कमी पाण्यातही काही पिके अधिक प्रमाणात तग धरून राहू शकतात. आवळ्याचे झाड तर सर्वाधिक पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे बागेतील आवळ्याला सध्या तुलनेने पाणी दिले जात नाही. आता मोसंबीच्या झाडावर फळे लगडली आहेत. त्यामुळे या पिकाला प्राधान्याने पाणी दिले जाते. 

बागेतील पेरू आणि आंब्याच्या झाडांमध्ये मल्चिंग केले आहे. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत अधिक काळ ओलावा टिकून राहतो. अशा प्रकारे झाडाच्या आवश्‍यकतेनुसार पाण्याचे उत्तम नियोजन करता येते. 

मी शेतीत मशागत करत नाही. रासायनिक खतेही देत नाही. त्यामुळे जमिनीत गांडुळे आणि लाभदायक जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे जमीन पोकळ होते आणि अधिक काळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. संपूर्ण फळबाग क्षेत्राचे गट पाडून आवश्‍यकतेनुसार पाणीपुरवठा करतो. झाडांना पाणी देण्यापूर्वी झाडाची पाने आणि जमिनीतील ओलावा यांचे निरीक्षण करून गरज लक्षात घेऊनच पाणी दिले जाते. नव्या तंत्राचा वापर करूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करता येते. पावसाचे पाणी साठवून ठेवून त्याचा पुनर्वापर करणे उपयुक्त ठरते. अर्थात वॉटर कंडिशनरचा वापर केला, पाण्याची गुणवत्ता सुधारली, शेत हिरवेगार झाले हे लगेच काही होणारे नाही. त्याला किमान एक-दोन वर्षे अवधी द्यावा लागतो. मात्र शेतकऱ्यांनी आज नियोजन सुरू केले तर पुढे त्यांना त्याची चांगली फळे नक्कीच मिळतील. 

पंढरीनाथ मोरे 
सांगवी भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर 
संपर्क - 9881269253