*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Saturday 22 December 2012

पाणीटंचाईशी सामना करीत डाळिंब केले यशस्वी

जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पाण्याची टंचाई असतानाही डाळिंबाची बाग जगविण्याची शर्थ केली. मागील दोन वर्षांपासून ते डाळिंबाची शेती करीत असून प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
बोअरचे पाणी विकत घेणे असो की टॅंकरचे पाणी वापरणे असो की साठवलेले पाणी असो, या ना त्या रीतीने त्यांनी पिकांचे पाण्याअभावी होणारे नुकसान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्याचे फळही त्यांना चांगल्या प्रकारे मिळाले आहे. 



जालना जिल्ह्यातील नळणी समर्थ हे भोकरदन तालुक्‍याच्या ठिकाणापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावरील छोटेसे गाव आहे. येथील शेती जिरायती प्रकारची आहे. काही होतकरू शेतकरी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मोसंबी, डाळिंब पिकांची निवड करतात. या गावातील संजय सुभाषराव वराडे यांचे शिक्षण बी.एस्सी. रसायनशास्त्र विषयात झाले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती मध्यम असून सुमारे 70 एकर संयुक्त शेती आहे. त्यांचे अजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्याकाळी परिसरात नावजलेले शेतकरी म्हणून अजोबा परिचित होते. त्यांच्या शेतीची परंपरा चालवण्याचे काम संजय करीत आहेत. सध्या संयुक्त कुटुंबाची शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. कापूस हे त्यांचे मुख्य पीक असून एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. त्याचबरोबर मका, गहू, ज्वारी ही पिकेदेखील ते घेतात. पारंपरिक पिकांत बदल करताना त्यांनी मागील वर्षी तीन एकर क्षेत्रात आले पीक, तीन एकरात मोसंबी घेतली. आल्याचे त्यांना एकरी 70 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. मोसंबीचेही एकूण क्षेत्रात सुमारे 18 ते 20 टन उत्पादन मिळाले. यापूर्वी त्यांनी उसाचादेखील प्रयोग केला असून लावणीचे त्यांना 50 ते 55 टन उत्पादन मिळाले आहे. मागील वर्षी हाच खोडवा पाण्याअभावी जगवणे त्यांना जिकिरीचे झाले. त्यामुळेच एकरी केवळ 27 टन उत्पादनावर त्यांना समाधान मानावे लागले. कापूस हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे पीक असले तरी वाढलेली महागाई व खर्च पाहता प्रति क्विंटल चार हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला तर ते परवडते असे ते म्हणतात. म्हणूनच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी फळपिकांकडे मोर्चा वळवला. त्यात नगदी पिकाचे उत्पन्न म्हणून दोन वर्षांपूर्वी त्यांनी डाळिंबाची निवड करून सुमारे साडेसातशे झाडांची लागवड केली. 13 x 9 फूट अंतरावर लागवड केली. भगवा वाणाची निवड केली. औरंगाबाद जिल्ह्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्याकडून 11 रुपये प्रति नग याप्रमाणे कलमे विकत आणली. सल्ला, नियोजन आणि पहिल्या अनुभवातील प्रयत्न यांचा मेळ घालून सुमारे दोन एकर क्षेत्रात त्यांना साडेपाच टन उत्पादन मिळाले. त्याला गुणवत्तेनुसार किलोला 40, 45 ते 50 रुपयांप्रमाणे भाव मिळाला. पहिल्या अनुभवानंतर डाळिंबाची लागवड वाढवली. आता एकूण पंधराशे झाडे असून, पैकी सुमारे दोन एकरातील झाडे उत्पादनक्षम होऊन त्यांनी उत्पन्न दिले आहे. उर्वरित झाडांपासून येत्या ऑक्‍टोबरपासून उत्पादन मिळण्यास सुरवात होणार आहे. 

पाण्याअभावी अशी जगवली बाग 
बहरात असताना पाणी कमी पडल्याने बाग वाया जाईल या हिशोबाने आपली पंधराशे झाडे जगविण्याचा प्रयत्न संजय यांनी केला आहे. सत्तर एकर क्षेत्रापैकी तीस एकर क्षेत्रावर त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. 

सुरवातीच्या टप्प्यात बागेला व्यवस्थित खते, पाणी, सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेणखत, निंबोळी पेंड आदींचे नियोजन केले. गरजेनुसार 12 .61.00, 19,19.19. 13.40.13., 0.52.34, 0.0.50 आदी विद्राव्य खतांचा वापर केला. जैविक घटकांमध्ये ट्रायकोडर्मा, गंध सापळे आदींचाही वापर केला. 

उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागल्याने संजय यांनी एका सहकाऱ्यांकडून बोअरचे पाणी विकत घेण्याचे ठरवले. त्यासाठी पाईपही खरेदी केला. एप्रिल-मेच्या काळात दोन महिने हे पाणी देऊन बाग जगविली. त्यासाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च करावा लागला. सहा ते आठ तासांसाठी सुमारे सहाशे रुपये (प्रति दिन) पाण्यासाठी खर्च करावे लागल्याचे संजय म्हणाले. शेततळ्याची सुविधा नसल्याने पाण्याची छोटी टाकी त्यांनी बांधली होता. त्यात साठवलेले पाणी टप्प्याटप्प्याने बागेला दिले. विहिरीचा स्रोत होता, मात्र त्यालाही पाणी कमी पडू लागले. 

पिकांच्या अवशेषांचाही वापर 
पाण्याचा थेंब वाया जाऊ नये म्हणून संजय यांनी प्रयत्न केले. काही प्रसंगी उसाचे पाचट, गव्हाचे अवशेष, तर काही वेळा चक्‍क पत्रावळ्यांचा वापर मल्चिंग म्हणून केला व जमिनीतील ओलावा टिकवण्याचा प्रयत्न केला. 
साडेसातशे झाडांसाठी हस्त बहराचे हे व्यवस्थापन होते. 

उत्पादन व उत्पन्न 
डाळिंबाची काढणी जून महिन्यात सुरू झाली तेव्हा केलेल्या प्रयत्नांचे खरे फळ मिळाल्याचे संजय यांनी सांगितले. त्यांना कमाल 1300 ते किमान 900 रुपये प्रति क्रेट दर मिळाला. सुमारे 1050 रुपये प्रति क्रेट या हिशेबाने 52 रुपये प्रति किलो भाव मिळाला. पाणी कमी पडल्याने काही वेळा फळे अपरिपक्‍व राहिली. मात्र ही फळेदेखील 800 रुपये प्रति क्रेट या भावाने विकण्यात आली. मालाची विक्री नाशिकच्या बाजारपेठेत केली. एकूण तीन लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांच्या हाती आले. यात कीडनाशके व खते यांच्यासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च आला. बोअरचे पाणी विकत घेताना 30 हजार रुपये खर्च आला. एक वर्ष बहर नियोजनासाठी साडेसातशे झाडांमागे सुमारे एक लाख 75 हजार रुपये खर्च झाला. यात खुरपणी, शेणखत, छाटणी, फवारणी, काढणी, तार, बांबू यासह किरकोळ खर्चाचा समावेश आहे. भारनियमन, मजुरी आणि पाणी या तीन मुख्य समस्या भेडसावत असल्याचे संजय यांनी सांगितले. प्रति व्यक्ती महिन्याला सहा हजार रुपये मजुरी द्यावी लागते. असे तीन मजूर ठेवले आहेत. याशिवाय वडील सुभाष वराडे, आई सौ. मीराबाई तसेच बंधू यांचीही मोलाची मदत मिळत असल्याचे संजय म्हणाले. 

मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादनात अधिक वाढ घेण्याचा संजय यांनी निर्णय घेतला होता. मात्र उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याने त्यांना अपेक्षित उद्दिष्टापर्यंत पोचणे शक्‍य झाले नाही. मात्र बोअरचे पाणी विकत घेणे असो की पाण्याची टाकी असो, त्याचा वापर करीत त्यांनी झाडे जगवून ती उत्पादनक्षम करण्यापर्यंत सारे कष्ट संजय यांनी समर्थपणे पेलले. 

टॅंकरने पाणी देऊन कपाशी जगवली  
उपलब्ध पाणीही मर्यादित स्वरूपाचे होते. हे लक्षात घेऊन बीटी कपाशीलाही संजय यांनी टॅंकरमार्फत पाणी दिले. 
सुमारे 2500 लिटर क्षमतेचा टॅंकर त्यांना 800 रुपयानं विकत घ्यावा लागला. असे पाच ते सात टॅंकर त्यांनी आताच्या काळात विकत घेऊन ते विहिरीत साठवले व त्या पाण्यावर कपाशी जगविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकवेळा डाळिंबाची बाग मर्यादित पाण्यात जगवताना एक दिवसाआड पाणी द्यावे लागले. आमच्या भागात पाण्याची टंचाई भासल्यानेच चांगले उत्पादन व उत्पन्न घेण्यावर मर्यादा येत असल्याचे संजय म्हणाले. त्यांच्या भागात 15 ते 20 शेतकरी डाळिंब उत्पादक आहेत. तेही सध्या टॅंकरने पाणी विकत घेऊन आपल्या बागांचे संगोपन करीत असल्याचे संजय यांनी सांगितले. 

शेती करीत असताना अडीअडचणी येतच असतात. त्यासाठी पर्याय शोधणे महत्त्वाचे असते. त्यातूनच हिंमत न हारता संजय समस्यांची सोडवणूक करीत राहिले. त्यांच्या बंधूंच्या मदतीने इंटरनेटचा आधार घेऊन त्यांनी डाळिंबाच्या शेतीसाठी सल्ला घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञान घेण्याची आवड, सतत कृषी विभागाशी संपर्क यामुळे पूरक योजनांचा लाभ घेऊन नवनवीन प्रयोग करून शेतीत यशस्वी होण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. संजय "ऍग्रोवन'चे नियमित वाचक आहेत. त्यांना कृषी विभागाने पुरस्कार दिला आहे. त्यातील रकमेतील काही भाग विभागाने ऍग्रोवनची वर्गणी भरण्यासाठी वापरला व त्याचा लाभ संजय यांना दिला. ऍग्रोवनमधील लेख, यशकथा यांचा आपल्या पीक नियोजनासाठी पुरेपूर उपयोग होत असल्याचे ते म्हणाले. 

संपर्क - संजय वराडे, 7588089509