*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Sunday 5 October 2014

लिंबू बहराबाबत माहिती हस्त बहर व्यवस्थापन

  1. 1. लिंबू बहराबाबत माहिती

उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथील तज्ज्ञ दत्तात्रेय जगताप यांनी दिलेली माहिती बहर धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. लिंबू पिकाला बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून - जुलै, सप्टेंबर - ऑक्‍टोबर आणि जानेवारी - फेब्रुवारीत अनियंत्रितपणे फुलोरा येतो. या फुलांचे प्रमाण अनुक्रमे 36, 15 व 49 टक्के एवढे असते. लिंबूत विशिष्ट बहर धरणे शक्‍य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहरासाठी ताण दिला, तर त्या वेळी अगोदरच्या बहराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात. उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहराची फळे दोन ते 2.5 महिन्यांची असतात. आंबे बहर घेतल्यास झाडावर हस्त बहराची फळे वाटाण्याएवढी असतात, ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहर धरणे लिंबूस शक्‍य होत नाही. त्यामुळे जुलै - ऑगस्ट दरम्यान 60-65 टक्के फळे मिळतात.

कागदी लिंबू फळांना उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन व बाजारभाव यावर अवलंबून असते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांना मागणी जास्त असते, त्यामुळे त्या काळात बाजारभावही चांगला असतो. म्हणून एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांचे उत्पादन घेण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


हस्त बहर व्यवस्थापन


हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल तर बागेला ताण बसत नाही, तसेच हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते. सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त 10 ते 15 टक्के असते.
फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये सायकोसिल या संजीवकाच्या 1000 पी.पी.एम. तीव्रतेच्या दोन फवारण्या एका महिन्याच्या अंतराने करून ऑक्‍टोबरमध्ये एन.ए.ए. या संजीवकाची 10 ते 15 पी.पी.एम. तीव्रतेची फवारणी करावी.

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, नागपूर येथे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्येही सायकोसिल या संजीवकाच्या 1500-2000 पी.पी.एम.च्या ऑगस्ट महिन्यात दोन फवारण्यांची शिफारस केलेली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि अखिल भारतीय समन्वित लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, तिरुपती येथे घेण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये हस्त बहरामध्ये फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जून महिन्यात 50 पी.पी.एम. जिब्रेलिक ऍसिड, सप्टेंबर महिन्यात 1000 पी.पी.एम. सायकोसिल व ऑक्‍टोबर महिन्यात एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केल्यास फुलोऱ्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

माहिती संदर्भ : अॅग्रोवनमाहिती संदर्भ : अॅग्रोवन

2. लिंबूवर्गीय पीक व्यवस्थापन सल्ला

1) बागेमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाणी सर्वदूर समप्रमाणात पसरावे, याकरिता साध्या तोट्या न वापरता दाब नियमक तोट्या वापराव्यात. यामुळे पाण्याचा दाब सारखा राखला जातो. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. 
2) संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड नऊ लिटर पाणी द्यावे, चार वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड 40 लिटर पाणी, आठ वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड 105 लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड 131 लिटर पाणी द्यावे. 
3) संत्रा व मोसंबीपेक्षा लिंबाच्या झाडाला पाण्याची गरज कमी असते. लिंबाच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड सहा लिटर पाणी द्यावे, चार वर्षाच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड 19 लिटर पाणी, आठ वर्षांच्या झाडाला प्रतिदिवस प्रतिझाड 57 लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला प्रतिझाड 92 लिटर पाणी द्यावे. 
4) जमिनीची मशागत आणि निंदणी करावी. 
5) अंबिया बहाराचे फळ तोडणी सुरू करावी. 
6) फळगळ कमी करण्याकरिता 1.5 ग्रॅम 2,4-डी किंवा जिब्रेलिक आम्ल आणि 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) आणि एक किलो युरिया यांचे 100 लिटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. 
7) मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता एक ग्रॅम जिब्रेलिक आम्ल अधिक दोन किलो मानो पोटेशियम फॉस्फेट किंवा दोन किलो डाय अमोनियम फॉस्फेट किंवा दोन किलो पोटॅशियम नायट्रेट प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण 15 ते 20 दिवसांच्या अंतराने फवारावे. 
8) फायटोफ्थोराग्रस्त झाडावर 2.75 ग्रॅम मेटॅलेक्‍झिक एम झेड 72 किंवा 2.5 ग्रॅम फोसेटील प्रतिलिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे. हे द्रावण झाडांभोवती टाकावे. 
9) झाडाच्या बुंध्यावर दोन फुटापर्यंत बोर्डेपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता एक किलो मोरचूद पाच लिटर पाण्यात आणि एक किलो चुना पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र पेस्ट करावी. 
10) रोपवाटिकाधारकांनी खुटांसाठी रंगपूर किंवा जंबेरीच्या बियांची पेरणी प्लॅस्टिक ट्रेमध्ये करावी. 
11) सध्याच्या काळात फुलातील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असतो. प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडून पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीला बारीक छिद्र पाडतात. पतंगांना आकर्षित करण्यासाठी 20 मि.ली मॅलेथिऑन किंवा 50 मि.लि. क्विनॉलफॉस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात 200 ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण प्लास्टिक ट्रेमध्ये ओतून यावर प्रकाशाचा सापळा लावून बागेत ठेवावे. झाडावरून गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. 
12) या महिन्यात पिकलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव असतो, नर माशीला आकर्षित करण्यासाठी अर्धा मिली मिथाईल युजेनाल आणि दोन मिली मॅलेथिऑन किंवा दोन मिली क्विनॉलफॉस प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. मिश्रण रूंद तोंडाच्या बाटलीत भरून बागेत ठेवल्याने नर माशा त्याकडे आकर्षित होऊन त्या द्रावणात पडतात. फळ तोडणीच्या 60 दिवसांपूर्वी हे मिश्रण भरलेल्या 25 रूंद तोंडाच्या बाटल्या एक हेक्‍टर क्षेत्र असलेल्या बागेत ठेवाव्यात. यातील कीटकनाशकांचे द्रावण दर सात दिवसांनी बदलावे. 
13) कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच दोन मिली डायकोफॉल किंवा दोन मिली इथिऑन किंवा 2 मिली ओमाईट किंवा तीन ग्रॅम विद्राव्य गंधक प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी. 


संपर्क -
दिनकरनाथ गर्ग(कीटक शास्त्रज्ञ) - 9822369030, 
पी. डी. कोरडे- (सिंचन व्यवस्थापन तज्ज्ञ ) - 9422333525 
जी. एम. बोरकर- ( रोग व्यवस्थापन तज्ज्ञ) - 9422805137. 

संपर्क -

0712/25003325 
डॉ. एम. एस. लदानिया, 
राट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर