
सामान्य माहिती :
अतिसुक्ष्म व किडींना रोगकारक असणा-या सजीवांना विषाणू म्हणतात. किडकांत आढळणा-या विषाणुच्या काही प्रजाती विशिष्ट किटकांमध्यच रोग निर्माण करतात. अशाच विषाणूंचे उत्पादन करून त्यापासून विषाणुयुक्त जैविक किडनाशक बनवितात. विविध ५०० संधिपाद सजीवांत ४५० प्रकारचे विषाणू आढळतात. किटकांतील ८३ टक्के विषाणू पतंगवर्गीय किडीत, १० टक्के भुंगावर्गीय किडीत तर ४ टक्के माशीवर्गीय किडीत आढळतात. न्युक्लीअर पॉलीहैड्रॉओसीस, ग्रॅन्युलोसीस, सायटोप्लासमिक पॉलिहैड्रॉसिस, एन्टोमोपॉक्स, इरीडेसन्ट, डेन्सीन्युक्लीओसीस आणि ड्रासोफिला सी.ओ.टू. विषाणू असे ६ गट आहेत. त्यापैकी विषाणूयुक्त जैविक कीडनाशके म्हणून सध्या फक्त न्यक्लीअर पॉलिहैड्रॉसिसचा वापर होतो. या विषाणूभोवती प्रथिनांचे कवच असते. कवचधारी विषाणूस विषाणूकोशिका म्हणतात. १ मिली. कीडनाशकात १०० ते २५० कोटी विषाणूकोशीका असतात. एक विषाणूकोशीका अळीस रोग करून मारण्यास पुरेशी असते. विषाणूरोगाचे स्वरूप – विषाणूकोशीका अळीच्या अन्नसंस्थेत प्रवेश केल्यावर कवच विरघळून विषाणू रक्तात शिरतो. रक्तपेशींच्या केंद्रावर हल्ला करून तेथे वाढतो. अळीचे संपुर्ण शरीर विषाणूमय होऊन अळीचे डोके सुजते संपुर्ण अंग काळसर पडते व फूटते. किटक झाडाचा शेड्याकडे जाऊन उलटे लटकावून घेऊन मरतो, किटक मेल्यावर तिच्या अंगातला विषाणू वातावरणात पसरून इतर अळ्यांत रोगाची साथ पसरून आश्चर्यकारकरित्या अळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाते.